

Deputy Inspector General of Police raids Matka bookies in Latur
लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून मटका बुकींवर कारवाई केली. या कारवाईत १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, २४ हजार २३० रुपये रोख आणि नऊ मोबाईल असा एकूण एक लाख २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे विशेष पथक कारवाईसाठी लातूरमध्ये पाठविले होते. या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्केट यार्ड गेट क्रमांक चारसमोरील प्रिया टी हाऊसजवळील एका शटरमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा टाकला.
तेथून नऊ हजार २८० रुपये रोख आणि ४६ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल, असा ५५ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनसोडे नगर येथे करण्यात आली. मोकळ्या जागेत मटका खेळविणाऱ्या आणि खेळणाऱ्या पाच जणांविरुद्ध कारवाई करून १४ हजार ९५० रुपये रोख आणि ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, असा ४४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांत एकूण १३ जणांवर कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.