Demand for strict action against artificially growing fruits
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा: झाडावरून तोडलेली फळे नैसर्गिकरित्या पिकण्यासाठी किमान तीन आठवडे लागतात. परंतु झटपट नफा कमावण्यासाठी फळ विक्रेते फळे पिकविण्यासाठी सर्रासपणे घातक रसायनांचा वापर करीत आहेत. हि नियमबाह्य आणि अवैद्य पद्धतीने होणारी फळ प्रक्रिया रोखण्यासाठी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने निर्देश दिले असतांनाही सर्रासपणे फळे पिकविण्यासाठी आजही घातक रसायनांचा वापर केला जात आहे. याची कडक अंमलबजावणी व्हावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
आंबा, चिकू, पपई, संत्रे मोसंबी अशा जाड सालपटाच्या कच्ची फळे पिकविण्यासाठी फळ विक्रेते सर्रासपणे कॅल्शियम कार्बाइडचा तर केळी पिकविण्यासाठी इकॉन या केमीकलचा वापर करतात. तर सफरचंदाला मेन लावून त्याला चकाकी आणणे तसेच पपई व टरबुजाला स्टेरॉईड सारखे घातक इंजेक्शन देणे हे प्रकार सर्रासणने घडत असल्याचे दिसून येते हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात बेकायदेशीर रसायणांचा किंवा गॅसचा वापर करून फळे कृत्रीम पद्धतीने पिकविण्याचे प्रकार आढळल्यास अन्न सुरक्षा मानके कायद्या अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जाते.
त्याअनुसंगाने संबंधीत विभागाकडुन विशिष्ट कालावधीत फळांचे नमुने तपासण्यात आले. मानके नियमानुसार कार्बाइड गॅसचा वापर करून फळे पिकविण्यावर पुर्ण बंदी असतांना व १०० पीपीएम तीव्रतेपर्यंत इथिलिन गॅसच्या नियंत्रीत वापरास मर्यादीत परवानगी असतांना त्याची फळविक्रेत्यांकडुन अमंलबजावनी होते का ? हा प्रश्न जनसामान्यांमधुन उपस्थित केला जात आहे.
याबाबत जनजागरन करण्यासाठी व फळे पिकविण्याच्या वैज्ञानिक पद्धतीवरील कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात असे संबंधीत विभागाने आदेशीत केले असतांना या आदेशाची कृषी उत्पन्न बाजार समितीकडुन अंमलबजावणी होत आहे कां ? हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावर कडक धोरण अवलंबिले तर खरोखरच रसायनांचा आणि अवैद्य पद्धतीचा वापर करून कृत्रिमरित्या फळे पिकविणाऱ्या फळ विक्रेत्यांवर वचक राहिल असे झाल्यास फळविक्रेत्यांनाही त्याचा विचार करावा लागणार आहे.
नैसर्गिकरीत्या फळे पिकविल्यास त्याची घणता कमी होऊन फळांचा रंग बदलतो व त्याला सुगंध येतो शिवाय त्याची चवही विकसित होते. कृत्रिमरीत्या फळे पिकविली तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे वास्तव नाकारता येत नाही. झटपट नफा कमावण्यासाठी सर्रासपणे फळविक्रेते रसायनांचा वापर करीत आहेत. अशा नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या फळांमुळे फळांचे सत्व कमी होते, फळांमध्ये रसायनांचा अंश उतरून अशी फळे आरोग्यासाठी घातक ठरतात. अनेक रोगांना बळी पडावे लागते, कधीकधी विषबाधा होऊन आरोग्य धोक्यात येते. यासाठी शासन व प्रशासनाने कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची नितांत गरज आहे.