Nilanga Taluka Drought | पावसाने पाठ फिरवली; निलंगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

भाजपचे तहसीलदारांना निवेदन; खरीप पिकांचे नुकसान, पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर
Latur Kharif Crop Damage
भारतीय जनता पक्षाच्या निलंगा तालुका शाखेने तहसीलदारांकडे दुष्काळ जाहीर करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.Pudhari
Published on
Updated on

Latur Kharif Crop Damage

निलंगा : खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसानंतर मागील सुमारे ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने निलंगा तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर निलंगा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी व नागरिकांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या निलंगा तालुका शाखेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.

यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात झालेला अल्प पाऊस आणि त्यानंतर निर्माण झालेला सुमारे ५० दिवसांचा पावसाचा खंड यामुळे पिकांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक भागांत पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आर्थिक नियोजनावर संकट आले आहे.

Latur Kharif Crop Damage
Sanjeev Sonawane Latur Crime: लातूरचे संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी उचललं टोकाचं पाऊल

पिकांना सध्या पावसाची नितांत गरज असतानाही पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह अन्य खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काही शेतकरी उपलब्ध पाण्याच्या आधारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने या प्रयत्नांनाही अडचणी येत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम निसर्गाच्या अवकृपेमुळे हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान, पावसाअभावी शेतीबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेक गावांतील पाणीसाठे आटण्याच्या मार्गावर असून, आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान, उपलब्ध पाणीसाठा आणि चाऱ्याची परिस्थिती यांचे तातडीने सर्वेक्षण करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Latur Kharif Crop Damage
Sanjeevani Bet Latur : संजीवनी बेटाला संशोधनाची ‘संजीवनी’ कधी ?

निलंगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत, पिकांचे नुकसान भरपाई, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी. प्रशासनाने केवळ पंचनामे व अहवालापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी अपेक्षाही भाजपकडून व्यक्त करण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, निलंगा विधानसभा निवडणूक प्रभारी दगडू सोळंके, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, नगराध्यक्ष संजय हलगरकर, औराद बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, पंचायत समिती सभापती सुनीताताई वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत होरे, तानाजी बिरादार, सं.गा.यो. अध्यक्ष मनोज पाटील, पंचायत समिती सदस्य बंकट बिरादार, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. संतोष वाघमारे, शहराध्यक्ष रवी फुलारी, दत्ता मोहोळकर, औराद बाजार समितीचे संचालक सुरेश बिरादार, जनार्दन सोमवंशी, शरद पेठकर, रमेश पाटील मसलगा, शेडोळ सरपंच स्वरूप धुमाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news