

CRPF parade draws attention; In the excitement of the swearing-in ceremony
लातूर, पुढारी वृत्तसेवा : क्रीडा कोट्यातून भरती झालेल्या बॅच क्रमांक ३३ चा पासिंग आउट परेड आणि शपथविधी समारंभ लातूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात पार पडला.
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या रंगरूट प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा पोलिस उपमहानिरीक्षक अमीरुल हसन अंसारी यांनी उत्तीर्ण जवानांचे अभिनंदन केले आणि त्यांना केंद्रीय राखीव पोलिस दलाची गौरवशाली परंपरा शिस्तबद्धपणे पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन केले. या परेडमध्ये २१ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले, ज्यामध्ये नौकाविहार, तायक्वांदो, ज्युडो, वुशू, जलतरण, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक, आर्चरी आणि आइस स्केटिंग यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश होता.
या नवीन जवानांना १६ आठवड्यांच्या मूलभूत प्रशिक्षणादरम्यान कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्यात आले. यात ड्रिल, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, फायरिंग यासारख्या सैनिकी कौशल्यांचा समावेश होता. यावेळी कमांडंट, मुख्य प्रशिक्षण अधिकारी पारसनाथ, इतर राजपत्रित अधिकारी, अधिनस्त अधिकारी, प्रशिक्षक आणि जवान उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणाचे कौतुक केले आणि जवानांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शपथविधीच्या प्रेरणादायी क्षणी जवानांनी राष्ट्रसेवा, निष्ठा आणि बलिदानाची शपथ घेतली. आता हे जवान आपापल्या खेळांमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करत भारताचे नाव उज्ज्वल करतील. केंद्रीय राखीव पोलिस दलाने दहशतवादविरोधी कारवाया, नक्षलविरोधी मोहिमा, निवडणूक सुरक्षा आणि नैसर्गिक आपत्ती निवारणात नेहमीच आघाडीची भूमिका बजावली आहे. दलाची शिस्तबद्धता आणि समर्पित सेवाभाव ही त्याची खरी ओळख आहे.