

Soybean, tur, jowar prices stable; safflower prices fall
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : २०२१ व २०२२ मध्ये दहा हजारांचा पल्ला पार केलेल्या सोयाबीनचा गतवर्षीपासून ४ हजार ३०० रुपयांवरच स्थिरावला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आपल्या घरातच ठेवलेले आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करूनही शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे माप होऊ शकले नाही. अशा शेतकऱ्यांना हमी भाव व बाजार भावातील फरकाची रक्कम मिळालेली नाही.
पाच मागील सहा महिन्यांपासून सोयाबीन, तूर, उडीद व ज्वारीचे भाव स्थिर आहेत. करडईच्या भावात घसरण झाली असून इतर धान्यांचे भाव कमी जास्त होत आहेत. शासनाच्या डीओसी व पामतेल आयात करण्याच्या धोरणाचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे.
तीन वर्षांपूर्वी सोयाबीनचे भाव दहा हजारांच्या वर गेले होते. सोयाबीनचे भाव वाढतील या आशेवर काही बड्या शेतकऱ्यांनी सोयाबीन न विकता ते घरातच जतन करून ठेवलेले आहे. मात्र चार हजार ३०० रुपयांच्या पुढे सोयाबीन सरकत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यात सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरू मागील चार पाच महिन्यांत काही धान्यांचे भाव स्थिर होते.
तर काहीचे भाव एकदम खाली आल्याचे दिसून येत आहेत. सोयाबीन, उडीद, ज्वारी, तूर -(८११), लाल तूर या धान्यांचे भाव स्थिर असून पांढरी तूर, जाकी चना, मूग, केडीएस सोया या धान्यांच्या भावात सततच चढ उतार होत आहे तर विजय चना, मील चना आणि करडई या धान्यांचे भाव एकदम कमी झाल्याचे दिसून येत आहे.
हमी भावापेक्षा बाजारात सोयाबीनचे भाव कमी होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली. काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली तर काहींना खरेदीचे मॅसेज येऊनही त्यांची खरेदी होऊ शकली नाही. सध्या सोयाबीनचा प्रश्न गंभीर झाला आहे. सोयाबीनला भाव नसतानाही शेतकरी दरवर्षी सोयाबीनलाच प्राधान्य देत आहेत.
शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेल्या व आता नविन उत्पादीत होणाऱ्या सोयाबीनला चांगला भाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने खाद्य-तेलावरील आयात शुल्कात वाढ करून सोयाबीनचे दर वाढवण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगतात.