

Cloudburst rain in Killari area
औसा, पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी दुपारी औसा तालुक्यातील किल्लारी, येळवट, कारला, तळणी, हरेगाव, जवळगा पो.. बानेगाव परिसरात अचानक मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जवळगा पो. नागरसोगा, चिंचोली तपसेतळणी, गुबाळ, बानेगावतळणी, येळवटतळणी मार्गांवर पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. या मुसळधार पावसामुळे किल्लारी, येळवट, बानेगाव, कारला परिसरातील पिके मातीसकट वाहून गेल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे.
जोरदार पावसामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीलगतच्या शेतातील पिके व माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कारला परिसरातील शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचून तळी निर्माण झाली असून हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
नागरसोगा भागात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे उसाचे फड जमीनदोस्त झाले. उटी बु येथील तावरजा नदीकाठी व सखल भागातील पिके पाण्याखाली गेली. ग्रामपंचायतीने पंचनामे करून मदतीसाठी निवेदन सादर केले आहे. शिवली भागात ७० हेक्टरवर असलेल्या पपई बागांचे प्रचंड नुकसान झाले असून कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत.
लखनगाव, सत्तर धरवाडी, आलमला परिसरातही खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. तहसीलदारांनी तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिले असून अनेक ठिकाणी काम सुरू झाले आहे. सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसगनि हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.