

Gold and silver prices rise; market turnover slows down
जालना, पुढारी वृत्तसेवा : पितृपक्षात सोने व चांदीच्या भावाने नवीन विक्रम स्थापित केला असून बुधवारी सोन्याचे भाव १ लाख ११ हजार रुपये तोळा तर चांदी १ लाख २८ हजार रुपये किलोपर्यंत पोहचल्याचे पहावयास मिळाले.
सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोनं-चांदी खरेदी परवडत नसल्याने बाजारपेठातील उलाढाल मंदावली आहे. दरम्यान विवाह किंवा अन्य महत्त्वाच्या मुहूर्ताना सोने खरेदी करण्यात येत असल्याने वाढत्या दरामुळे ग्राहकांचे खिसे रिकामे झाले आहेत. दिवाळीच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ होणे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र पितृपक्षात सोने व चांदीच्या भावाने विक्रमी पातळी गाठल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुढील काळात दर आणखी वाढतील या भीतीने अनेक ग्राहक आताच सोने खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे, हिंदू धर्मात खरेदीसाठी चांगल्या न मानल्या जाणाऱ्या पितृपक्षातही अनेकजण सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. उच्च दरांमुळे दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची विक्री कमी होण्याचा अदांज सोन्याचांदीचे विक्रेत्याने वर्तविला आहे. ही भाववाढ ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. ज्वेलर्ससाठी सोने विक्रीच्या दृष्टीने एक आव्हान ठरणार आहे.
एक तोळ्याचा दर ऐकून ग्राहक डोक्याला हात लावत आहेत. शुक्रवार पासून सोन्याचांदीच्या भावात तेजी आल्याचे पहावयास मिळाले. चांदीचे दर १ लाख ३२ हजारावरुन बुधवारी घसरुन १ लाख २८ हजारांवर आले. औद्योगिक क्षेत्रात सोलर पॅनेल, इले-क्ट्रिक वाहनांची बॅटरी यासारख्या क्षेत्रात चांदीचा वापर होत असल्याने चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. सोने व चांदीच्या दरात होणाऱ्या वाढीचा फायदा गुंतवणूकदार घेता आहेत. ज्यामुळं गुंतवणुकदारांचे लक्ष दोन्ही मौल्यवान धातुंकडे आहे. सोने व चांदीच्या दरात होणारी वाढ सर्व समान्य व गोरगरिबांच्या आवाक्या बाहेर झाल्याने आगामी काळात सोने व चांदी खरेदीचा कल या वर्गातून कमी होण्याची शक्यता आहे.