

Citizens crowded to see Hazrat Peer Gaibibaba
किनगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील हजरत पीर गैवीबाबा यांचा उरूस बुधवारपासून सुरू झाला असून बुधवारी रात्री ८ वाजता वाजत गाजत गावातून संदल मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते. तर गुरुवारी बाबांच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती.
संदल मिरवणूक बुधवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयापासून निघून मुतावली मुसा फतुसाब शेख यांच्या घरातून फुलांचा झेला, चादर खिलाफ, हिरवे निशाण, प्रसादाची सामग्री व आदी साहित्य घेऊन वाजतगाजत गावातून हजरत पीर गैबिबाबांच्या दर्गाहापर्यंत येऊन चादर चढवण्यात आली. यावेळी प्रभारी सरपंच विठ्ठलराव बोडके, सहायक पोलिस निरीक्षक माणिक डोके, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे, मंडळाधिकारी अण्णाराव नागदरे ग्राम महसूल अधिकारी गायत्री टाले, कृषी सहाय्यक सदाशिव हंगे, व उरूस कमिटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. गुरुवारी दुपारनंतर मोठी गर्दी पीर गैबीबाबांच्या दर्शनासाठी झाली होती.
दर्शनासाठी लांब लाईन लागली होती. शनिवारी दुपारी २ वाजता नामवंत मल्लांच्या कुस्त्या पार पडणार आहेत. येथील कुस्त्याचा आखाडा रंगतदार होतो. ज्यां मल्लांना कुस्ती खेळण्यासाठी भाग घ्यायचा आहे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासी संपर्क करावा, असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
आज शुक्रवारी सकाळी १० वाजता हजरत पीर गैबीबाबांच्या जियारतचा कार्यक्रम पीर गैबीबाबा दर्गाहात पार पडणार आसून या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी सरपंच विठ्ठलराव बोडके व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.