

Udgir Latur Child Case 100 Rupees Bond Unauthorized Adoption
उदगीर: उदगीर शहरातील इंदिरानगर येथील एका अठरा महिन्यांच्या चिमुकल्यास शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर अवैधरित्या दत्तक दिले. या प्रकरणी बुधवारी ( दि. २८) रात्री दहाच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात वकिलासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १० ते १२ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील इंदिरा नगर येथील परवीन अल्लाउद्दीन पिंजारी यांची मुलगी महेक हिने आपले बाळ महेबुब याला जबीन अहेमद बागवान व अहेमद जबीनसाब बागवान यांना शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर बेकायदेशीर दत्तकपत्र करून दिले होते. यावेळी ५ जणांनी अवैध दत्तक बाँडवर साक्षीदार म्हणून सह्या केल्या. तर एका वकिलानेही ओळख म्हणून सही केली होती.
याप्रकरणी धम्मानंद विनायक कांबळे (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात परवीन अल्लाउद्दीन पिंजारी (रा. इंदिरानगर, उदगीर, जि. लातूर), जबीन अहेमद बागवान, अहेमद जलीलसाब बागवान (दोघे रा. येरमे नगर, जळकोट रोड, उदगीर, सध्या रा. भवानी दापका, ता. कमालनगर, जि. बिदर) शेख ताहेर अब्दुलसाब, शामद जलीलसाब बागवान, अरबाज शामद बागवान, शहनाज जलीलसाब बागवान, गुलाम यासदानी शेख (सर्व रा.उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे हे करीत आहेत.