

जयपाल ठाकूर
औसा : शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची तयारी आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास असेल, तर पारंपरिक पिकांपेक्षाही पालेभाज्यांतून लाखोंचे उत्पन्न मिळू शकते, हे औसा तालुक्यातील आलमला येथील प्रयोगशील तरुण शेतकरी लिंगेश्वर सोमनाथ खिचडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
ऊस, केळी, टरबूज आणि रेशीम शेतीतील आर्थिक चढ-उतारांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी कोथिंबीर लागवडीचा मार्ग स्वीकारला. आज याच कोथिंबिरीने त्यांचे आर्थिक चित्र पालटले असून, अवघ्या दीड ते दोन महिन्यांत तीन एकर क्षेत्रातून १३ लाख ५१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
लिंगेश्वर खिचडे यांनी अनेक वर्षे विविध नगदी पिके आणि फळबागांचे प्रयोग केले. मात्र वाढता उत्पादन खर्च, बाजारातील भावातील अनिश्चितता आणि नैसर्गिक संकटांमुळे अपेक्षित नफा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी पीकपद्धतीचा सखोल अभ्यास करून कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या पालेभाजीकडे वळण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार वर्षांपासून ते नियोजनबद्ध पद्धतीने कोथिंबीरची लागवड करत असून, सातत्याने भरघोस उत्पन्न घेत आहेत.
यंदाच्या हंगामात त्यांनी तीन एकर क्षेत्रावर कोथिंबीरची लागवड केली. या लागवडीसाठी सुमारे १ लाख ३१ हजार ५०० रुपये खर्च आला. योग्य व्यवस्थापन, वेळेवर सिंचन, संतुलित खतांचा वापर आणि बाजारपेठेचे नियोजन यामुळे अवघ्या दीड महिन्यातच त्यांना १३ लाख ५१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. सर्व खर्च वजा जाता सुमारे १२ लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांच्या हाती राहिला.खिचडे यांच्या मते, शेतीत यशस्वी व्हायचे असेल तर बदलत्या काळानुसार पीकपद्धती बदलणे आवश्यक आहे.
बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यास पालेभाज्यांतूनही मोठे आर्थिक यश मिळू शकते. कमी कालावधीत रोख उत्पन्न देणारे पीक म्हणून कोथिंबीर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.औसा सारख्या दुष्काळसदृश व पर्जन्यछायेखालील व कमी सिंचन सुविधा असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या तरुण शेतकऱ्याने नवीन आदर्श निर्माण केला आहे.
आज त्यांच्या यशोगाथेमुळे तालुक्यातील व परिसरातील अनेक शेतकरी कोथिंबीर आणि इतर पालेभाज्यांच्या लागवडीकडे वळत आहेत. पारंपरिक पिकांच्या चौकटीबाहेर पडून नव्या संधी शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लिंगेश्वर खिचडे यांची ही वाटचाल निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.