प्रदीप पाटील
औराद शहाजानी : यंदाच्या खरीप हंगामाच्या प्रारंभीच पावसाने ओढ दिल्याने औराद शहाजानीसह परिसरातील शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत आहेत. १ जून ते १३ जुलै या कालावधीत परिसरात केवळ १२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत हा पाऊस अत्यल्प आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या असून अनेक शेतकरी अद्यापही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
साधारणपणे जून अखेरपर्यंत खरीप पिकांच्या बहुतांश पेरण्या पूर्ण होतात. मात्र यंदा जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने पेरणीची योग्य संधी शेतकऱ्यांना मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी हलक्या पावसावर विश्वास ठेवून धाडसाने पेरणी केली; परंतु त्यानंतर पावसाने पुन्हा खंड दिल्याने बियाण्यांची उगवण अपुरी राहिली, तर अनेक ठिकाणी उगवलेली रोपे कोमेजू लागली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्याचे शेतकरी जयराज थेटे यांनी सांगितले. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आणि मका या प्रमुख खरीप पिकांसाठी वेळेत पेरणी होणे अत्यंत महत्त्वाचे असते. उशिरा पेरणी झाल्यास पिकांच्या वाढीचा कालावधी कमी होऊन उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता वाढते.
त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढलेला शेतीखर्च, महागडी बियाणे, खते व इतर निविष्ठांचा खर्च यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. जिरायती शेतीबरोबरच बागायती शेतीलाही पाण्याअभावी मोठा फटका बसत आहे. विहिरी, कूपनलिका आणि लहान जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने घटल्याने फळबागा, भाजीपाला आणि ऊस पिकांना नियमित पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे.
अनेक ठिकाणी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी बंद पडण्याची वेळ आली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होत आहे. खत, बियाणे आणि कृषी औषधांच्या विक्रीवर परिणाम झाला असून, शेतमजुरांना अपेक्षित प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. कृषी क्षेत्राशी निगडित अनेक पूरक व्यवसायही मंदावल्याने ग्रामीण अर्थचक्रावर त्याचे प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, पुढील काही दिवसांत दमदार आणि सलग पाऊस झाल्यास उशिराने का होईना पेरण्या पूर्ण होऊ शकतील. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास यंदाचा खरीप हंगाम गंभीर धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून, समाधानकारक पावसाची ते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपलब्ध ओलाव्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्याचे, उशिरा पेरणीसाठी योग्य व अल्पकालीन वाणांची निवड करण्याचे तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे.
नर्सरी व्यवसायालाही फटका
अत्यल्प पावसाचा फटका शेतीसोबतच शेतीपूरक उद्योगांनाही बसू लागला आहे. विशेषतः नर्सरी व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी वृक्षलागवडीचे प्रमाण घटल्याने रोपांच्या मागणीत सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे. विक्रीअभावी लाखो रुपयांची रोपे निकामी होऊन फेकून द्यावी लागत आहेत. परिणामी नवीन रोपांची निर्मितीही पूर्णपणे थांबविण्यात आली असून, त्यामुळे नर्सरी मालकांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे.
"पावसाअभावी वृक्षलागवडीचे प्रमाण कमी झाल्याने रोपांच्या विक्रीत सुमारे ५० टक्के घट झाली आहे. विक्री न झाल्यामुळे लाख ते दोन लाखांपर्यंतची रोपे निकामी झाली असून ती फेकून द्यावी लागली. त्यामुळे नवीन रोपांची निर्मिती पूर्णपणे बंद केली आहे. याचा आमच्या व्यवसायाबरोबरच मजुरांच्या रोजगारावरही गंभीर परिणाम झाला आहे."
प्रताप मुळे, संचालक, मुळे नर्सरी, औराद शहाजानी