

NEET protest debate Parliament : दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतर विरोधकांच्या निशाण्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी संसदेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चेचा प्रस्ताव दिला. मात्र, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव तात्काळ फेटाळून लावत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर बोलताना अमित शहा म्हणाले की, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत. आज दुपारी ३ वाजता चर्चेला सुरुवात करूया. मी स्वतः सभागृहात उपस्थित राहून गुरुवारी दुपारी ३ वाजता यावर सविस्तर उत्तर देईन. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचे संसदेचे नियम असतात, विरोधक आपल्या अटी लादू शकत नाहीत, असे सांगत त्यांनी आधी वक्तव्य करण्याची विरोधकांची मागणी फेटाळली.
'भगोडा' आणि 'लापता' यांसारख्या शब्दांवर आक्षेप घेत शाह यांनी विरोधकांना चर्चेचे आव्हान दिले. ते म्हणाले, “सर्वप्रथम, सध्या भारतात सार्वजनिक आणि संसदीय जीवनात ‘भगोडा’ (missing) आणि ‘लापता’ (absconding) यासारखे शब्द वारंवार ऐकायला मिळत आहेत. अधिवेशन सुरू झाल्यापासून मी नियमितपणे संसदेत उपस्थित राहत आहे. माझ्या कार्यालयातही बसत आहे. परंतु, जेव्हा विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू देत नसेल, तेव्हा काय करता येणार?. चर्चेबाबत सांगायचे तर, आमचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ‘नीट’ (NEET) आंदोलन आणि विद्यार्थ्यांची निदर्शने या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. आम्ही अशी सूचना केली होती की चर्चेची वेळ निश्चित केली जावी आणि विरोधी पक्षाने त्याला संमती द्यावी. ती त्यांची सुरुवातीची मागणी होती आणि आम्ही ती मान्य केली होती.”
अमित शहा यांनी केलेल्या चर्चेच्या आवाहनानंतर काही मिनिटांतच राहुल गांधी यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. "देशातील तरुणांना गृहमंत्र्यांचे ऐकायचे नाही, त्यांनी थेट राजीनामा द्यावा," अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी म्हणाले, "विरोधी पक्षाने स्पष्टपणे सांगितले आहे की, अमित शहा यांनी आम्हाला उपदेश करावा, यात आम्हाला कोणताही रस नाही. जेव्हा मी 'आम्ही' असे म्हणतो, तेव्हा माझा उद्देश देशातील तरुण पिढी असा असतो. विद्यार्थ्यांनीवर गोळ्या कोणी चालवल्या? खिळे लावलेल्या लाठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले? आमच्या मुलांवर गोळ्या झाडण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले होते का?, असे सवाल करत त्यांनी तसे केले असेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. गेल्या २० दिवसांपासून अमित शाह बेपत्ता आहेत. भारताच्या गृहमंत्र्यांमध्ये हिंमत नाही; ते सभागृहात येऊ शकत नाहीत," असा दावाही राहुल गांधींनी केला.