रोहीणा येथे तरुणाचा विहीरीत बुडून मृत्यू
चाकूर : तालुक्यातील रोहीणा येथील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाचा विहीरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.६) घडली.
मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव महेश भुजंग रोडे असे आहे. तो रोहिणा येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबातील होता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर तो पोलीस भरतीचा सराव करीत होता. महेश बुधवारी (दि.६) विहिरीवर अंघोळीला गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. त्यांने विहीरीत उडी मारली असता तो पाण्यातून वरती आलाच नाही. तो पाण्यामधेच अडकुन बसला आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. उशीरा गावातील काही मित्रांना ही बाब कळाल्यानंतर गावातील पोलीस पाटील फुलचंद केंद्रे आणि काही नागरिकांनी विहीरीवर जाऊन पाहिले असता त्या विहिरीवर महेशचे कपडे आणि मोबाईल दिसला. यावरुन गावकऱ्यांना महेश विहिरीत अडकल्याचा अंदाज आला. त्याला विहीरीत शोधण्याचा प्रयत्न केला परंतु विहीरीत पाणी जास्त असल्यामुळे शोध घेता आला नाही.
तात्काळ या घटनेची माहिती पोलीस व महसुल विभागाला कळवली असता त्यांनी अहमदपूर येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. विद्युत मोटारीच्या साहय्याने विहीरीतील पाणी उपसून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात त्यांना यश आले.चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रोहीणा येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून चाकूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

