

A car was completely destroyed in a fire in the Vanavada area; the driver was burned to death.
औसा : पुढारी वृत्तसेवा
औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री एका कारला भीषण आग लागून चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निर्जन ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हा अपघात आहे की घातपात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. गणेश गोपीनाथ चव्हाण (वय ३५, रा. औसा तांडा, सध्या रा. औसा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडा शिवारातील एका निर्जन ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास एका स्कोडा कंपनीच्या कारने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच संपूर्ण गाडी आगीच्याभक्ष्यस्थानी पडली. आगीची तीव्रता इतकी होती की, गाडीत असलेला चालक गणेश चव्हाण यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, त्यामुळे त्यांचा गाडीतच कोळसा झाला.
दिलेल्या नातेवाईकांनी माहितीनुसार, गणेश चव्हाण हे मूळचे औसा तांडा येथील असून सध्या ते औसा शहरात राहत होते. शुक्रवारी रात्री कोणाचा तरी फोन आल्याने ते घराबाहेर पडले होते, मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.
त्यानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सकाळी घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.