

A biker died in an overtaking competition between two cars
जळकोट, पुढारी वृत्तसेवा कार दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना नांदेड - उदगीर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर पाटोदा खूर्द (ता. जळकोट) येथे गुरुवारी (दि.१२) घडली.
धडक दिलेली कार व थार गाडी यांच्यात ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेच्या नादात धडक लागून दुचाकीस्वाराचा नाहक मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर सतत होणारे अपघात व त्यातून होणारी जीवितहानी हा एक चिंतेचा विषय बनत चालला आहे.
घोणसी (ता. जळकोट) येथील साईनाथ जयराम जानतिने (३५) हे घोणसी येथून दुचाकीने जळकोटकडे येत होते. तर एक कार जळकोटकडून उदगीरच्या दिशेने जात होती. ही दोन्ही वाहने राष्ट्रीय महामार्गावरील पाटोदा खुर्दजवळ येताच त्यांची आमनेसामने जोरदार धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती दुचाकीस्वार साईनाथ जानतिने हे आकाशात काही फूट उंच उडाले व दो-नशे फूट दूर फेकल्या गेले. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात जाऊन पडले, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. खाली पडल्यानंतर जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
मृत तरुण एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तो कामावर जळकोटला येत असताना हा अपघात झाला. या धडकेने कारच्या समोरचा भागही चेंदामेंदा झाला आहे. मृत साईनाथ जानतिने यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, बहीण, भाऊ व आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे.