

जळकोट : नांदेड-उदगीर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर पाटोदा खुर्द (ता. जळकोट) येथे कार आणि मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, धडक दिलेल्या कार आणि थार या वाहनामध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या बेदरकार स्पर्धेमुळे निष्पाप दुचाकीस्वाराचा नाहक बळी गेला. राष्ट्रीय महामार्गावर सतत होत असलेले अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी हा गंभीर चिंतेचा विषय बनत चालला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोणसी (ता. जळकोट) येथील साईनाथ जयराम जानतिने (वय ३५) हे आपल्या मोटारसायकलने घोणसीहून जळकोटकडे येत होते. त्याच वेळी जळकोटकडून उदगीरच्या दिशेने एक कार येत होती. पाटोदा खुर्दजवळ दोन्ही वाहने समोरासमोर आली असता त्यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलस्वार साईनाथ जानतिने हे हवेत काही फूट उंच उडून सुमारे दोनशे फूट दूर फेकले गेले व रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. खाली पडताच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मयत साईनाथ जानतिने हे जळकोट येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. कामासाठी जळकोटकडे येत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या धडकेमुळे कारच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. साईनाथ जानतिने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, एक बहीण, एक भाऊ तसेच आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने घोणसी व जळकोट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघातातील मृतदेह ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.