

6 Arrested While Preparing to Commit Robbery
औसा/बेलकुंड पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सिंदाळा येथील नागपूर रत्नागिरी महामार्गाजवळ असलेल्या राधिका कलाकेंद्रावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पहाटेच्या सुमारास आलेल्या ६ दरोडेखोरांना भादा व औसा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रंगेहाथ पकडले. आरोपींच्या ताब्यातून तलवारी, कत्ती, चाकू आणि लोखंडी रॉड जप्त केले असून, आर-ोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांच्या या अत्यंत शिताफीने व वेगाने केलेल्या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मंगळवार (दि.१९) रोजी पहाटे चार च्या सुमारास हा थरार घडला. शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील दरोडेखोरांची एक गँग राधिका कलाकेंद्राच्या आवारात शस्त्र घेऊन दबा धरून बसली होती. कलाकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे काही संशयास्पद हालचाली आणि त्यांच्या हातातील तलवारींचे पाते चमकताना दिसले.
कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने ११२ या आपत्कालीन पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधत पोलिसांना तत्काळ माहिती दिली. माहिती मिळताच भादा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महावीर जाधव आणि औसा पोलिसांचे संयुक्त पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची गाडी येताच दरोडेखोरांनी शेज ारच्या शेत शिवारात आणि झुडपांमध्ये लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून शोधमोहीम राबवली आणि ६ आरोपींना जमिनीवर पाडून जेरबंद केले.
अटकेतील आरोपींची नावे (सर्व रा. जिल्हा धाराशिव): दत्ता भगवान माने (वय २६, रा. कुनसावळी), कार्तिक प्रकाश वागमोडे (वय २२, रा. कुनसावळी), भीमाशंकर नागेश दामशेट्टी (वय १९, रा. येणेगूर), साई सतीश पंडित जाधव (वय २१, रा. येणेगूर), अक्षय शिवराज दुधभाते (वय २९, रा. येणेगूर), महेश शिवराज सोलंकर (वय १९, रा. आचलेर) अशी आहेत.
या कारवाईसाठी सपोनि महावीर जाधव, पोलिस हवालदार शिंदे, कांबळे, चव्हाण, राऊत, कॉन्स्टेबल संदीप राठोड, एएसआय खेडकर व चंद्रकांत कलमे यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पुरी हे करत आहेत.