

120 bags of soybeans were dumped in the pond.
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीने रेणा नदीला आलेल्या पुरात नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे खळे करून सोयाबीन शेतावर ठेवलेले १२० पोती सोयाबीन रात्रभर पाण्यात भिजले. त्यामुळे जवळपास पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले. पावसात भिजलेल्या सोयाबीनला करे फुटुन ते खराब झाल्यामुळे खराब झालेले सर्वच सोयाबीन उकिरड्यावर टाकून दिले आहे. मात्र तहसील प्रशासनाला नुकसानीची माहिती देऊनही कोणीच पंचनामा करण्यासाठी आले नाही अशा तक्रार दत्तात्रय इगे यांनी केली आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसाने सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी उरले सुरले सोयाबीनचे पीक काढून त्याच्या शेतावर गंजी लावल्या तर कांही शेतकऱ्यांनी खळे केले. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने नारायण इगे, सुशीलाबाई इगे व दत्तात्रय इगे यांनी आपल्या शेतातील सोयाबीनचे खळे करून १२० पोती रात्री शेतावरच ठेवली रात्री अचानक पाऊस आल्याने वरील शेतकऱ्यांची सर्वच पोती पाण्यात भिजली हे सर्व सोयाबीन पाण्यात भिजल्यामुळे काळे पडून खराब झाले.
त्यात या शेतकऱ्यांचे जवळपास ६ लाखांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी करून आपणास नुकसान भरपाई व विमा मिळावा अशी मागणी नारायण इगे, सुशिलाबाई इगे व दत्तात्रय इगे यांनी रेणापूरच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली होती. निवेदन देऊनही प्रशासनाने कसलीच दखल घेतली नाही अशी तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसात भिजलेले सोयाबीन नासून ते कुजून गेले त्याला बाजारात कोणीही घ्यायला तयार नाही जनावरही खात नाही त्यामुळे १२० पोती सोयाबीन खड्डा करून त्यात पुरून टाकले. शासनाच्या हमी भावाप्रमाणे ५ ते ६ लाखांचे आमचे नुकसान झाले आहे शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी व विमा लागू करावा अशी मागणी नारायण इगे, सुशिलाबाई इगे व दत्तात्रय इगे यांनी केली आहे.