Latur Crocodile Rescue | देवणी तालुक्यात उसाच्या फडात ११ फुटांची मगर जेरबंद; साडेतीन तासांची थरारक रेस्क्यू मोहीम

देवणी तालुक्यातील बोरोळ येथे मांजरा नदीकाठी वन विभाग, पोलिस आणि सर्पमित्रांचे संयुक्त प्रयत्न
 Deoni Sugarcane Field Crocodile Rescue
Deoni Sugarcane Field Crocodile RescuePudhari
Published on
Updated on

Deoni Sugarcane Field Crocodile Rescue


देवणी :
देवणी तालुक्यातील बोरोळ येथे मांजरा नदीकाठच्या शेतातील उसाच्या फडात तब्बल ११ फुटांची जिवंत मगर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. सोमवारी सकाळी आढळलेल्या या मगरीला वन विभाग, पोलिस प्रशासन आणि सर्पमित्रांनी संयुक्त प्रयत्नांतून साडेतीन तासांच्या थरारक रेस्क्यू मोहिमेनंतर सायंकाळी ६ ते ६.३०च्या सुमारास जेरबंद केले. मगर पकडण्यात आल्यानंतर शेतकरी आणि नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बोरोळ येथील शेतकरी चंद्रशेखर उर्फ अमोल अशोक बोरुळे यांच्या मांजरा नदीकाठच्या शेतातील उसाच्या फडात सोमवारी सकाळी ११च्या सुमारास ही मगर दिसून आली. त्यांच्या शेतात भागीदारीने काम करणारे लक्ष्मण बालुरे यांच्या निदर्शनास मगर आली. त्यांनी तातडीने सरपंच कृष्णा पाटील यांना याबाबत माहिती दिली.

 Deoni Sugarcane Field Crocodile Rescue
Sanjeevani Bet Latur : संजीवनी बेटाला संशोधनाची ‘संजीवनी’ कधी ?

मगरीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सरपंच कृष्णा पाटील यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर देवणी पोलिस ठाण्यालाही याबाबत कळविण्यात आले. वन विभाग आणि पोलिस प्रशासनाने तत्परता दाखवत स्थानिक सर्पमित्रांना पाचारण केले.

ड्रोनच्या साहाय्याने उसाच्या शेतात मगरीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर पोलिस, वन विभागाचे अधिकारी, सर्पमित्र आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. उसाचे दाट पीक आणि उपलब्ध साधनसामग्रीची मर्यादा यामुळे मगरीला पकडण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ६ ते ६.३०च्या सुमारास ११ फुटांच्या या मगरीला जेरबंद करण्यात यश आले.

ही कारवाई देवणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड, वन विभागाचे अधिकारी बोराडे, पोलिस अंमलदार मनोज कांबळे, कुरे, स्थानिक सर्पमित्र आणि ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात आली.

 Deoni Sugarcane Field Crocodile Rescue
Sanjeev Sonawane Latur Crime: लातूरचे संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी उचललं टोकाचं पाऊल

नदीकाठच्या गावांत भीतीचे वातावरण

मांजरा नदीपात्रालगतच्या गावांमध्ये मगरींच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही बटनपूर येथे मगरी आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. बोरोळ, सिंधीकामट, बटनपूर, विजयनगर, लासोना तसेच सीमाभागातील लखनगाव, होरंडी आणि सोनाळ परिसरातही मगरी नेहमी आढळत असल्याचे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news