लोहारा; कालिदास गोरे : Killari Earthquake : लातूर -उस्मानाबादेत दि. 30 सप्टेंबर 1993 रोजी भूकंप झाला. त्याला तब्बल 28 वर्षे पूर्ण झाली. तरी भूकंपाच्या आठवणी ताज्या आहेत. घरांचे पुनर्वसन झाले; परंतु मानसिक पुनर्वसन करणे अजूनही शक्य झाले नाही.
6.4 रिश्टर स्केलच्या (Killari Earthquake) या भूकंपामुळे सात हजारांवर लोकांचा बळी गेला. 16 हजार लोक जखमी झाले. 52 गावांतील 30 हजार घरं धरणीच्या पोटात गडप झाली होती. किल्लारीला भूकंप झाला अशा बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसारित होत असल्याने किल्लारीकडे मदतकार्य करण्यासाठी प्रशासन, मदत कार्य करणार्या संस्था, स्वयंसेवक धावू लागले.
लोहारा तालुक्यातील सास्तूर व परिसरातील गावांची स्थितीही काही वेगळी नव्हती. सास्तूर व परिसरातील गावांना मोठ्या प्रमाणावर भूकंपाच्या धक्क्याने नुकसान झाले होते. त्यामुळे मृतांचा खच पडलेला दिसत होता. उमरगा येथील हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवण्यासाठीही जागा नव्हती. जखमींवर शक्य ते उपचार करणे सुरू होते. मदत कार्यात प्रचंड अडथळे येत असतानाही मदतीचा ओघ वरचेवर वाढत होता.
भूकंपाची दाहकता एवढी मोठी होती की, कितीही मदत अपुरी पडत असल्याने शेवटी लष्कराला पाचारण करण्यात आले. ऑपरेशन सहायता युद्धपातळीवर सुरू झाले. लष्कराने अभूतपूर्व असे काम केले. सैनिकांच्या कष्टामुळेच येथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकली.
भूकंपानंतर मदतकार्यासाठी असंख्य संस्था या भागात आल्या. तात्पुरती मदत करायला आलेल्या संस्था वर्षाच्या आत परत गेल्या. मोजक्याच संस्था या भागात नियोजनपूर्वक काम करीत होत्या. त्यांनी येथील जीवन हे शेतीवर अवलंबून असल्याचे ओळखून विहिरीतील गाळ काढणे, शेतकर्यांना खते, बियाणे, मोटर व पाईपलाइन देणे, शेतीची अवजारे देणे, शेतीपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन देणे असे शेतकर्यांच्या उपयोगी पडणारे कार्यक्रम राबवले. भूकंपानंतर शिक्षणाच्या सुविधा वाढल्या.
अनेक नवीन शाळा सुरू झाल्याने शिक्षणाची सोय गावात व आसपासच्या गावांमध्ये झाली. मुला-मुलींच्या शिक्षणाचे प्रमाणही वाढले आहे. भूकंपानतंर आरोग्य सेवाही चांगल्या प्रकारे सुधारली आहे. गावातच प्राथमिक उपचारांची सोय झाली. सास्तूर येथील 'स्पर्श रुग्णालया'च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा दिल्या जातात. स्पर्श रुग्णालयाच्या वतीने मोबाईल फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून गावागावांत जाऊन उपचार केले जातात. त्यामुळे आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे गतिमान झाल्याचे दिसून येते.
नुसती घरं बांधून दिली की पुनर्वसन पूर्ण होत नसते. शिक्षण, आरोग्य, रोजगार, मानसिक, सामाजिक व आर्थिक सक्षमता मिळावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असते. त्यासाठी दूरगामी नियोजन व प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता असते. तसे न झाल्याने भूकंप होऊनही 28 वर्षांनंतर अनेक उणिवा राहिल्याचे दिसून येते.