

Youth Murdered by Slitting of Throat at Siraswadi
जालना, पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका २५ वर्षीय तरुणाचा झोपेत असताना गळा चिरून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील वाघमारे शेत वस्तीवर शुक्रवारी (दि.१०) रोजी रात्री घडली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित विधी संघर्ष मुलाला ताब्यात घेतले आहे. निखिल वाघमारे (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील वाघमारे हा विधी संघर्ष मुलाचा मित्र होता. निखिलचे आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय विधीसंघर्ष बालकाला येत होता. याच रागातून खुनाची घटना घडल्याचे समजते. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोघांची पार्टी झाली. त्यानंतर निखिल गाढ झोपेत असताना त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्याचा खुन करण्यात आला.
या भीषण हल्ल्यात निखिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. फरार होण्याच्या तयारीत असलेल्या विधी संघर्ष मुलाला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर पवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पुढील तपास पो. उपनिरीक्षक वंदना गिरी करत आहेत.
शनिवारी सकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. दुपारी शोकाकुल वातावरणात सिरसवाडी येथे निखिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनैतीक संबंधातून खून?
सिरसवाडी येथे झालेल्या खुन प्रकरणास अनैतीक संबंधाची किनार असल्याचा संशय आहे. आरोपी व मयत हे दोघे मित्र होते. मात्र मित्रानेच मैत्रीला धोका देत आपल्या आईसोबत सूत जुळवले असा संशय आरोपीच्या डोक्यात होता. हा राग मनात ठेवून त्याने मित्राचा गळा चिरून खून केला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणातील संशयीतास ताब्यात घेतले असून तपासात खूनाचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.