

Yoga is the concentration of mind and body
जालना, पुढारी वृत्तसेवा : योग म्हणजे जोडणे... शरीर मन यांचे मिलन म्हणजे योग... शरीर व मनाची एकाग्रता व संतुलन साधने म्हणजेच खऱ्या अर्थाने योग साधने होय, अशा शब्दात योगाची उपयुक्तता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी स्पष्ट केली.
त्यांनी दै. पुढारीच्या प्रतिनिधीशी जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. बातचित करताना ते पुढे म्हणाले, की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
भारतीय धर्म संस्कृतीमधील योग संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते.
या प्रकारात आसन, सूर्यनमस्कार, प्राणायाय, ध्यान या क्रिया केल्या जातात. योगामध्ये अनेक संस्था व शासन यांनी पुढाकार घेतला आहे. ही एक प्राचीन भारतीय विद्या आहे. जगासाठी ती वरदान ठरत आहे. तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्या काळापासून या विद्देचा अभ्यास केला जात होता. आज २१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. ही भारतासाठी अत्यन्त गौरवाची व अभिमानाची बाब आहे.
योगाचे विज्ञान म्हणजे योगाचा शरीरावर, मनावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास. योगामध्ये शारीरिक आसनं श्वासोच्छ्रुास आणि ध्यान यांचा समावेश असतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे एक निरोगी आणि संतुलित जीवनशैली आहे.
शिवाय, योग हे केवळ एक शारीरिक व्यायाम नाही, तर ते एक समग्र जीवनशैली आहे. योगामुळे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधला जातो, ज्यामुळे एक निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होते, असेही शेवटी त्यांनी सांगितले.