

Women, beware! A gang of gold chain snatchers is active in the city
जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड चौफुली व बसस्थानकातील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना ताजीच असताना बुधवार, १ जुलै रोजी सोनसाखळी चोरांकडून एका महिलेचे गंठण हिसकावण्याचा प्रयत्न तर दुसऱ्या घटनेत ६५ वर्षीय वृध्देचे दीड लाख रुपयांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दोन्ही घटना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.
पहिली घटना शहरातील राठी कोचिंग क्लासेससमोर दिवसाढवळ्या घडली. संगीता गोपीकिशन लोहिया (५८, रा. संभाजीनगर मानिकनगर, जालना) या बुधवार, १ जुलै रोजी दुपारी ३:५० वाजेच्या सुमारास त्यांच्या स्कुटीवरून श्रीकृष्णरुक्मिणीनगर येथील ब्युटी पार्लरमध्ये जात होत्या. त्या राठी कोचिंग क्लासेस समोर आणि वन्सब्ल्यु बेल सोसायटीजवळ आल्या.
पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीं चालत्या स्कुटीच्या समांतर आपली दुचाकी आणून संगीता यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून चोरी करण्याचा प्रयत्न केला. संगीता लोहिया यांनी धाडस दाखवत तातडीने गळ्यावर हात ठेवला आणि मोठा आरडाओरडा केला. घटनास्थळी लोकांची गर्दी होत असल्याचे पाहून चोरट्यांनी घाबरून मोटारसायकलवरून पळ काढला. महिलेचे सोने वाचले.
दुसरी घटना बडी सडक परिसरातील क्षीरसागर हॉस्पिटलसमोर घडली. कुंकू टिळ्याचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी ४.२५ वाजेच्या सुमारास शकुंतला शिवकुमार राठी (६५, रा. लक्ष्मी नारायण ऑईल मिलजवळ, जालना) या पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण (चेन) जोरात हिसकावले. झटापटीत त्या रस्त्यावर कोसळल्या.
त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दीड लाख रुपयांचे गंठण चोरून नेले आहे. त्यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार विनोद श्रीधर निकम करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी
याप्रकरणी शकुंतला राठी यांच्या जबाबावरून सदर बाजार पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०९ (४) (रोख रकमेसाठी किंवा मौल्यवान वस्तूंसाठी जबरी चोरी/दरोडा घालणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर बाजार पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक संदीप सुभाष भारती यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
चोरटे जवाहर बाग चौकीकडे पसार
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शकुंतला कमालीच्या घाबरल्या, मात्र त्यांनी हिंमत करून आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक तत्काळ घटनास्थळी जमा झाले, मात्र तोपर्यंत दोन्ही चोरटे मोटारसायकलवरून जवाहर बाग चौकीच्या दिशेने सुसाट वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले. घाबरलेल्या अवस्थेत शकुंतला यांनी आपले दीर हरिकिशन राठी यांना फोन करून बोलावून घेतले. हरिकिशन राठी यांनी त्यांना सोबत घेऊन सदर बाजार पोलिस ठाणे गाठले.