

जाफराबाद ः जाफराबाद-भोकरदन मार्गावरील नर्मदा पॅलेसजवळील गतिरोधक एका महिलेच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंधारात गतिरोधक न दिसल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मी एकनाथ कांबळे ( 40, रा. ब्रह्मपुरी, ता. जाफराबाद) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रविवार (दि. 17 मे) रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी चालकाला रस्त्यावरील गतिरोधक अंधारामुळे दिसून आला नाही. त्यामुळे दुचाकी जोरात उडाल्याने मागे बसलेल्या लक्ष्मी कांबळे या रस्त्यावर फेकल्या गेल्या. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, संबंधित गतिरोधकावर रिफ्लेक्टर, पांढरे पट्टे तसेच कोणतेही इशारा फलक नसल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “रस्ते सुरक्षेच्या मूलभूत उपाययोजनांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे एका महिलेचा निष्पाप जीव गेला. याला जबाबदार संबंधित यंत्रणाच आहे,” असा संतप्त सूर नागरिकांतून उमटत आहे.
गतिरोधक काढणार - “सदर ठिकाणी टाकलेले गतिरोधक काढून घेण्यात येतील. तसेच येत्या आठ दिवसांत आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यानंतर रिफ्लेक्टर पट्टे व नव्याने सुरक्षित गतिरोधक बसविण्यात येतील,” अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून देण्यात आली.
शैलेश सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम