

Weekly market shifted, temporary market to be held at Badnapur market complex
बदनापूर, पुढारी वृत्तसेवाः शहरात भरणारा आठवडे बाजार आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित करण्यात आला असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. शहरात शुक्रवारी आठवडे बाजार भरत असलेल्या पूर्वीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने या ठिकाणी पाणी साचून या मैदानाला तलावाचेच स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे बाजारातील भाजीपाला, फळे, इतर वस्तू पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांनादेखील मोठे नुकसान सहन करावे लागत होते. बाजारात विविध समस्यांचा सामना व्यापाऱ्यांसह नागरिकांना करावा लागत होता. ही गंभीर बाब वेळोवेळी नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
त्याअनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन शहराचा आठवडे बाजार हा पावसाळा संपेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविण्यात येणार असल्याचे पत्रक काढून सूचित केले आहे. दुकाने बाजार समितीच्या आवारातच लावावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. आठवडे बाजार स्थलांतर करण्यात आल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोंडीतून सुटका बदनापूर येथे बाजार भरत असलेल्या ठिकाणाहून पैठण - राजूर हा मोठा मार्ग असून बदनापूर रेल्वे स्टेशनला जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या मार्गावर विविध शाळा आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये स्कूल बससह विविध येणाऱ्या वाहनामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. बाजाराचे स्थलांतर झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघणार आहे.