

Accused in Jiradgaon murder case nabbed within 24 hours
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील जिरडगाव शिवारात शेतजमिनीच्या वादातून नामदेव अंजिराम पाईकराव यांचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी घनसावंगी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपासाची चक्रे फिरवत दोन जणांना अटक केली. सुनील अंजिराम पाईकराव (रा. नाशिक) आणि सागर आनंदा चंद्रमोरे (रा. म्हसरूळ, नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिरडगाव शिवारात हॉटेल मालक नामदेव पाईकराव यांच्या खुनाची घटना सोमवार (दि. ३०) रात्री घडली होती. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. आरोपींच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात मयत नामदेव पाईकराव यांचा भाऊ सुनील पाईकराव याने शेतजमिनीच्या वादातून साथीदार सागर चंद्रमोरे याच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी सुनील पाईकराव आणि सागर चंद्रमोरे यांना ताब्यात घेत अटक केली. गुरुवार (दि. १) रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अंबड सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
इतर बाबींचा उलगडा होणार
जिरडगाव येथील खून प्रकरणानंतर घनसावंगी पोलिसांनी तपासाला वेग देत विविध दिशांनी माहिती संकलित केली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासांत दोन्ही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. पुढील तपासात खुनासाठी वापरलेले शस्त्र, हत्येचे नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.