

Wallet thieves on police radar during Navratri celebrations
अंबड / शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड येथील नवरात्रोत्सवात पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तत्पर आहे. नवरात्रोत्सवात पाकीटमार, टवाळखोर व गावगुंड पोलिसांच्या रडारवर राहणार असल्याचा इशारा पोलिस उपअधिक्षक सिध्देश्वर धुमाळ यांनी दिला.
अंबड शहारात १८ सप्टेंबर रोजी अंबड- घनसावंगीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांनी नवरात्र महोत्सव २०२५ च्या अनुषंगाने मत्स्योदरी संस्थान परिसरास भेट देऊन पाहणी केली. यावेळी बंदोबस्त दुचाकी-चारचाकी पार्किंगचीही त्यांनी पाहणी केली.
यात्रेदरम्यान लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने पार्किंग, दुकाने, नारळ, कटलरी, ज्वेलरी दुकानांची पाहणी करून त्यांनी संबंधिताना सूचना दिल्या. या वेळी संस्थानच्या पुजारी व विश्वस्त गीता विलास कुंटेफळकर, संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे तसेच कर्मचारी उपस्थित होते. पोलिस उपअधीक्षक धुमाळ यांनी यावेळी नवरात्र उत्सव काळात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा जागरूक राहणार असल्याचे सांगितले.
पाकीटमार, टवाळखोर व गावगुंडांवर पोलिसांची नजर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस २४ तास तत्पर असून यात्रेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने भाविकांनी निर्धास्तपणे उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलिस उपअधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ यांनी मत्स्योदरी मंदिर परिसराची पाहणी करीत सर्व गोष्टी जाणून घेतल्याने यंदाचा नवरात्रोत्सव यात्रा निर्विघ्न, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडेल अशी आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे.