

Wakadi Gram Panchayat does not allocate funds to schools
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाचा २५ टक्के निधी वाटप करण्यात आला नाही. त्यामुळे येथील शाळेची भौतिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहेत. दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून शाळेच्या वतीने वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला असून देखील याकडे स्थानिक ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहेत.
ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. शासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे विद्यार्थ्यांना या शाळांत पुरेशा भौतिक व शैक्षणिक सोई उपलब्ध करून देणे शक्य होत नाही म्हणून ८६ व्या घटना दुरुस्तीने ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा संमत करण्यात आला. तो आता मूलभूत हक्क झाला आहे. दर्जेदार प्राथमिक शिक्षण, तसेच जीवनासाठीच्या शिक्षणावर भर देणे, प्राथमिक शिक्षणाची सर्वांना समान पातळी निर्माण करणे यासह इतर बाबी या योजनेत समाविष्ट आहेत.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करून विविध योजना राबविण्यात येत आहे, तर दुसरीकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. येथील शाळेला आवश्यक सुविधांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, वर्ग खोल्यांत पंखे, नवीन खोली बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, डिजिटल साहित्याचा वापर, रॅम्प सुविधा, शालेय रंगरंगोटी, शाळा ई-लर्निंग करणे, शाळेला शैक्षणिक साहित्य पुरवठा करणे, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छोटे वाचनालय उभारणे, शाळा खोली दुरूस्ती, मैदान तयार करणे यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करून साहित्य खरेदी करण्यात अशी मागणी करण्यात आली आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरवर्षी शासनाकडून वाकडी ग्रामपंचायतीने येथील शाळेसाठी निधी उपलब्ध होतो, परंतु गेल्या तीन वर्षांपासून या शाळेला एक रुपयांचा निधी देण्यात आला नाही. तर हा निधी कुठे खर्च केला असा सवाल उपस्थित होत आहेत.