

Wai Zilla Parishad school premises drunken hangout on holidays
पांगरी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील वाई येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी तळीरामांची शाळा भरत असल्याचे चित्र आहे. शाळेच्या प्रांगणात दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून येत आहे.
वाई जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहेत. या शाळेच्या आवारात शनिवार, रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी शाळेच्या आवारात देशी दारू पिऊन रिकाम्या बाटल्या अज्ञात तळीरामांकडून टाकण्यात येत आहे. हा प्रकार शाळेतील शिक्षक व पालकांच्या निदर्शनास येत आहे.
दरम्यान या शाळेच्या पाठीमागील बाजूस भिंत किंवा तार कंपाउंड नसल्यामुळे पाठीमागच्या बाजूने आवारात तळीराम प्रवेश शाळेच्या शाळेच्या करतात. शाळेच्या समोरच्या प्रांगणात सुट्टीच्या दिवशी तळीरामांची शाळा भरत आहे. तळीराम दारु पितांना सर्वत्र गुटख्यासह तंबाखु भुंकुन घाण करीत आहेत.
याचा वाईट परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गुटखा खाऊन धुंकलेल्यासह दारुच्या बाटल्यांचा लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी याप्रकरणी तक्रार करणे आवश्याक आहे. तळीराम हे गावातीलच असल्याने ग्रामपंचायत प्रशासनातील सरपंच व सदस्य यांनी त्यांना दम भरला पाहिजे. नसता यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी तक्रार करावी, अशी मागणी होत आहे.
शाळेसाठी शैक्षणिक विकासासाठी येणारा निधीतून शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे गरजेचे आहे. शाळेच्या पाठीमागच्या बाजूला दोन व समोर दोन असे चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पालक वर्गातून जोर धरत आहे.