

Farmers are in double trouble due to fall in the price of Mosambi
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मोसंबीचे माहेर घर म्हणून सर्वदूर नावलौकिक प्रसिद्ध असलेले अंबड तालुक्यातील गोड रसरशीत मोसंबीला आता मगरी रोगाचा फटका बसू लागल्याने मोसंबीची मोठी गळ वाढलीय. तर दुसरीकडे मोसंबीच्या दरात घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे अर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
अंबड तालुका हा मोसंबी उत्पादनात मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे. तालुक्यात ९७३६ हेक्टर क्षेत्रावर मोसंबी फळबागांची लागवड आहे. शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागांची लागवड करून चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न उराशी बाळगले होते. मात्र सध्या मोसंबीच्या फळावर मगरी रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. मोसंबी फळांवर येणारा मगरी रोग म्हणजे मोसंबीचे पक्न व अपरिपक्व फळ डेटाच्या ठिकाणी पिवळे पडते आणि हे फळ देठापासून गळून पडते.
यंदा या मोसंबीला १३ ते १८ हजार रुपये टन असा कवडीमोल भाव मिळत आहे. त्यातच आता मगरी या रोगाने मोसंबीवरती मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्याने मोसंबीच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली आहे. याचा शेतकरीवर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच शेतकरी सततचा दुष्काळ,नैसर्गिक आपत्ती, रोगराई, जाणवत गेलेली भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी यावर मात करत गत अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फळ बागातून भरपूर उत्पन्न मिळेल अशी आशा मोसंबी उत्पादक बाळगून राहते. यंदा पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना झाले तरी परिसरात एकही जोरदार पाऊस झाला नाही.
गेल्या महिनाभर परिसरात ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत असल्याने मोसंबी, डाळिंब बागांना मगरी रोगाने ग्रासल्याने बागेतील अर्धेअधिक फळे गळून पडली आहेत. फळगळ प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा पावसाचा खंड पडल्यामुळे मोसंबीच्या फळाची गळती सुरू झाले आहे. मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी जमिनीमध्ये तापमान वाढल्याने मोसंबीला याचा फटका बसला आहे. जुलैच्या सुरुवातीला मोसंबीला चांगला भाव असल्या कारणांमुळे व्यापाऱ्यांने शेतकऱ्यांची मोसंबी १९ हजार रुपये ते २५ हजार रुपये या भावाने मोसंबी खरेदी केली आहे. मात्र आज तीच मोसंबी १५ ते १७हजार रुपये टनाने दिल्लीसह आदी बाजारपेठ विक्री होत असल्याने व्यापारीही वर्गही संकटात सापडले आहेत.