

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव वाळू घाट क्रमांक 2 मधून अवैध व ओव्हरलोड वाळू वाहतूक होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शहागड-पैठण रोडवर मंगळवारी सकाळी तीव्र आंदोलन केले.यावेळी वाळूने भरून आलेल्या अनेक हायवा वाहने संतप्त ग्रामस्थांनी अडवून धरत प्रशासनाकडे वाहनांतील वाळुची तात्काळ मोजमाप करण्याची मागणी केली.
साष्टपिंपळगाव परिसरात अवैध व ओव्हरलोड वाळु वाहतुकीचा प्रश्न एैरणीवर आला आहे.मंगळगवारी या प्रश्नावर ग्रामस्थांनी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरु केलेले आंदोलन दुपारी एक वाजेपर्यंत चालले. ग्रामस्थांनी शहागड-पैठण रोडवर हायवा वाहने रोखून धरल्याने काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, साष्टपिंपळगाव वाळू घाट क्रमांक 2 मधून पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून नियमांपेक्षा जास्त वाळू भरून हायवा वाहने रस्त्यावर धावत आहेत.
ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आंदोलना दरम्यान ग्रामस्थांनी महसूल व पोलिस प्रशासनाला घटनास्थळी बोलावून संबंधित हायवा वाहनांचे वजन व मोजमाप करण्याची मागणी केली.
साष्टपिंपळगाव -2 या वाळू घाटातून सहा ते सात हायवा या ओव्हरलोड वाळू घेऊन जात असताना शहागड-पैठण रोडवर त्या 50 ते 60 गावकऱ्यांनी अडवल्या. याबाबत अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी मेसेज व कॉल केले. मात्र कोणीही सहकार्य केले नाही. उलट तुमच्या जीवाला धोका होईल असे उच्चस्पदय अधिकाऱ्याने मेसेज केला. त्यानंतर वाळू माफीयाची टोळी तेथे आली व त्यांनी आम्हाला धमक्या देऊन आडवलेल्या हायवा नेल्या.
शहादेव औटे, ग्रामस्थ साष्टपिंपळगाव