

Vadod Tangda School Selected for 'Adarsh Shala' Scheme
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरातून शाळेचे कौतुक होत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेत राज्यातील ठराविक शाळांची निवड त्यांच्या शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आधारित केली जाते. वडोद तांगडा शाळेने या सर्व निकषांवर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
या निवडीमुळे आता शाळेचा कायापालट होणार आहे. यामध्ये अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम आणि डिजिटल क्लासरूम आणि विज्ञान प्रयोग शाळा, खेळाचे मैदान समृध्द ग्रंथालय आदी साधनाचा समावेश होणार आहे. वडोद तांगडा जिल्हा परिषद शाळेचा या योजनेत समावेश झाल्याबद्दल ग्रामस्थाच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख विलास पळसकर, डॉ. सी. आर. तांदुळजे, वर्धमान वासकर, उपसरपंच नाना तांगडे, नारायण तांगडे, बाजीराव तांगडे, गोपाल तांगडे आदीची उपस्थिती होती.