

Urban problems in Sundarnagar on the agenda, statement to the Municipal Corporation
जालना, पुढारी वृत्तसेवा शहरातील चंदनझिरा परिसरातील प्रभाग क्रमांक १२ मधील सुंदरनगर व भगवाननगर भागातील विविध नागरी समस्या ऐरणीवर आल्या आहेत. या समस्यांकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुंदरनगर व भगवाननगर परिसरात अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, झोपडपट्टी पीआर कार्ड सर्वेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सर्वेक्षण रखडल्यामुळे रहिवाशांना घरांच्या अधिकृत नोंदी, शासकीय योजनांचा लाभ तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मशिदीजवळ नालीची व्यवस्था नाही
सुंदरनगर परिसरातील अबू हुरेरा मस्जिदजवळ नालीची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरात मोठे डबके तयार झाले असून, अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे शेख शफीक, रियाज पठाण, ताराबाई लहाने, अंजली लहाने, दुर्गा पवार आणि शमशोद्दीन यासीन आदींनी निवेदनात नमूद केले आहे.
अतिक्रमणाचा विळखा
चंदनझिरा येथील मौलाना आझाद चौकातील अतिक्रमणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ऑटोरिक्षा तसेच भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येबाबत महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.