

Two men on a bike opened fire on a young man
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील मुजाहिद चौकात गुरुवारी मध्यरात्रीनंतर दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी एका इसमावर गोळी झाडल्याची घटना घडली. या घटनेत सदर इसमाच्या जबड्यात गोळी लागली असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील मुजाहिद चौकात गुरुवारी मध्यरात्री नंतर दोन जण दुचाकीवर आले. यावेळी त्यांनी चौकात उभ्या असलेल्या अकबर खाँ बाबरखॉ (३१) यास अंबड चौफुलीचा पत्ता विचारला. अकबरखॉ हा पत्ता सांगत असतानाच दुचाकीवरील इसमांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिक रस्त्यावर आले. जखमी झालेला अकबर खॉ बाबरखॉ हा चायनीज हॉटेल चालवतो त्याला तातडीने जुन्या जालन्यातील एका खासगी रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी वाजेद खॉ नवाब खॉ यांच्या फिर्यादीवरून कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयूष नोपाणी साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी कदिम जालना व स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. सदर इसमावर कोणत्या कारणावरून गोळीबार झाला व कोणी केला याचा पोलिस शोध घेत आहे. पोलिसांच्यावतीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.
जालना शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिस्तूल, तलवार, खंजीर व इतर शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने पोलिसांसाठी अवैध शस्त्र डोकेदुखी बनले आहे. यापूर्वीही शहरासह जिल्ह्यात गोळीबार करण्याच्या घटना घडल्या असल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे.