

Transfer of Health Officers with counselling
जालना, पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या सेवाकाळात एक वेळची बाब म्हणून बदली करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच पारित करण्यात आला आहे. २३ ते २५ जून दरम्यान समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील जवळपास दीडशे समुदाय अधिकाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नेमणूक झालेले समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. गेली काही वर्ष विविध संघटनाकडून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विनंती बदली करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. तृतीय स्तरीय आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने एक वेळची बाब म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक निर्णय घेत सेवाकाळातील एक वेळची बाब म्हणून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बदली धोरणास मान्यता दिली आहे.
त्यामुळे सध्या वेगवेगळ्यात जिल्ह्यात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदलीसाठी विनंती करता येणार आहे. सदर आंतरजिल्हा बदली संचालक-१ आरोग्य सेवा, मुंबई यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदली करीता इच्छुक समुदाय आरोग्य अधिकारी यांचेकडून १२ जूनपर्यंत अर्ज मागविण्यात येणार असून प्राप्त अर्जाची छाननी १३ ते १९ जूनपर्यंत होणार आहे.
बदली पात्र समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची यादी २० जून रोजी आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार आहे. २३ जून ते २५ जून या कालावधीत विनंती बदली संदर्भाने समुपदेशन आयोजित करण्यात येणार आहे. समुपदेशनानंतर बदली करण्यात आलेल्या समुदाय अधिकाऱ्यांना ०७ जूलै पर्यंत रुजू होणेसाठी मुदत देण्यात येणार आहे.
सूचना दिल्या जिल्हांतर्गत बदलीसाठी शासनामार्फत सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार बदली प्रक्रिये संदर्भाने समिती स्थापन करण्याच्या सूचना जिल्ह्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार असून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिक लोकाभिमुख सेवा मिळणार असल्याची शक्यता आहे.