

Resolved to give 11 kg silver for Nath Maharaj's palanquin
जालना, पुढारी वृत्तसेवा :
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या १४२ वर्षांच्या परंपरेने सजलेल्या आषाढी वारी पालखी सोहळ्यातील रथाला पुणे येथे चांदीची सजावट करण्यात येत असून, काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. १५ जूनपर्यंत हे काम पूर्णत्वाकडे न्यावयाचे असून, त्यासाठी १२० किलो चांदीची आवश्यकता आहे.
जालना शहरातूनही ११ किलो चांदीचे योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आतापर्यंत ८० किलो चांदी जमा झाली असून, आणखी ४० किलो चांदीची आवश्यकता असल्याने, इच्छुकांनी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज प्रतिवर्षी आषाढी वारीला त्यांच्या वैभवाप्रमाणे चांदीच्या रथातून पंढरीला जावेत ही सकल वारकऱ्यांची भावना लक्षात घेऊन नाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याकरीता सागवानाचा नवीन रथ आणि त्याला १२० किलो चांदीचा साज चढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या रथाचे काम प्रगतीपथावर आहे. चांदीमध्ये रथाच्या सजावट कार्यासाठी लोकवर्गणीद्वारे निधी संकलन सुरू असून, आणखी ४० किलो चांदीची आवश्यकता आहे. जिल्ह्यातून रथासाठी ११ किलो चांदीच्या योगदानाचा संकल्प आहे.