

Traffic changes due to Angarki Chaturthi
जालना, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील राजुर येथे अंगारीका चतुर्थीनिमीत्त मंगळवार (५) रोजी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार असल्याने भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जालना शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष आदेश जारी केले आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयांच्या आदेशानुसार शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीत मंगळवार (४) ते ६ मे च्या सकाळपर्यंत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
भोकरदन तालुक्यातील राजूर येथे मंगळवारी अंगारीका चतुर्थीनिमीत्त लाखो भाविक पायी व वाहनातुन येउन राजुरेश्वराचे दर्शन घेतात. दर्शनासाठी चार ते पाच लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने आदेश लागू केला आहे.
भोकरदनकडून जालना येथे येणारी जड वाहतूक (भाविकांची वाहने वगळून) देऊळगाव राजा मार्गे वळवण्यात येणार आहे. भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून जालना दिशेने जाणारी जड वाहतूक माहोरा-जाफराबाद-देऊळगाव राजा मार्गे वळवण्यात येणार आहे. दाभाडी मार्गे भोकरदनकडे जाणारी जड वाहतूक हसनाबाद मार्गे वळवण्यात येईल.
देऊळगाव राजा मार्गे जालना येथे येणारी जड वाहतूक देऊळगाव राजा मागनिच पर्यायी मागनि जाईल. देऊळगाव राजा-जाफराबाद-माहोरा मार्गे भोकरदनकडे जाणारी जड वाहतूक त्या मागनिच वळवण्यात येईल.
सहकार्य करा
वाहतूकीतील हा बदल ०४ मे रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते ०६ मे रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जड वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला मदत करण्याचे अवाहन करण्यात आले आहे