

तळणी : राज्यात कोट्यवधींचे महामार्ग सिमेंट काँक्रेटचे होत असताना वाघाळा टाकळखोपा इंचा या तीन गावांच्या ग्रामस्थांच्या वाट्याला मात्र खड्डे, चिखल आणि प्रशासनाची बेपर्वाई आली आहे. परिसरातील पुर्णापाटी इंचा टाकळ खोपा वाघाळा हा सुमारे 6 कि.मी. लांबीचा रस्ता अक्षरशः मृत्यूच्या वाटेवर पोहोचला असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांनी नागरिकांचे दैनंदिन जीवन असह्य झाले आहे.
टाकळखोपा गावातील सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः गावातील 700 ते 900 मीटरचा रस्ता पूर्णतः उखडला असून खड्ड्यांत कायम पाणी साचलेले आहे. वाहनांची सततची ये-जा सुरू असल्याने हा भाग अपघातप्रवण ठरला आहे.
या गंभीर परिस्थितीकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने कानाडोळा केल्याने अखेर वाघाळा, टाकळखोपा व इंचा येथील ग्रामस्थांनी सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 पासून टाकळखोपा येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यापूर्वी 28 जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देण्यात आले होते; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंट काँक्रेटचे महामार्ग होत असताना वाघाळाटाकळखोपाइंचा ग्रामस्थांच्या वाट्याला मात्र तात्पुरती मलमपट्टीही नाही. “हा रोड डांबरी नव्हे, सिमेंट काँक्रेटचा करा,” अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, रस्त्याची तातडीने दुरुस्ती व दोषी ठेकेदारावर कारवाई न झाल्यास उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्ते अरुण कांगणे यांनी दिला आहे.
5 कोटींचा निधी, पण दर्जा शून्य काम
वाघाळाटाकळखोपाइंचा मार्गासाठी आमदार बबनराव लोणीकर यांनी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र काम ठेकेदारांना देताना गुणवत्ता, देखरेख व जबाबदारी यांचा बळी दिल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. निकृष्ट दर्जाचे काम झाले असतानाही संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई न होता उलट प्रशासन त्यालाच पाठीशी घालत असल्याचा संताप ग्रामस्थांमध्ये आहे.
शेतकऱ्यांसह, विद्यार्थी भरडले जातायेत
या रस्त्यावरून दररोज दूध व भाजीपाला वाहतूक करणारे शेतकरी तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संकटात सापडले आहेत. पायी चालणे कठीण झाले असून दुचाकी व चारचाकी वाहनांची वारंवार घसरण होत आहे. अपघाताचा धोका वाढला असतानाही प्रशासन ढिम्म आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांनी थेट खड्ड्यांत उतरून आंदोलन केले; तरीही सत्ताधाऱ्यांना जाग आली नाही.