

Criminals Externed Jalna
भोकरदन : भोकरदन आणि हसनाबाद पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी कार्तिक पानिग्रही यांनी विजय माधवराव चिंचपुरे, विजय सुदाम टोम्पे आणि नारायण कुंडलिक पवार या तिघांना जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि जळगाव या चार जिल्ह्यांच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश १९ ऑक्टोबर रोजी जारी केले.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये विजय माधवराव चिंचपुरे (रा. वाकडी, ता. भोकरदन), विजय सुदाम टोम्पे आणि नारायण कुंडलिक पवार (दोघेही रा. चांदई एक्को, ता. भोकरदन) यांचा समावेश आहे.
भोकरदन आणि हसनाबाद पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात या तिघांविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याच्या उद्देशाने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हद्दपारीच्या कालावधीत संबंधित तिघांना सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय आदेशात नमूद केलेल्या चार जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करून ते या जिल्ह्यांमध्ये प्रवेश करताना किंवा आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे भोकरदन तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.