

The threat of unseasonal rains looms just as the wheat and gram harvest is about to begin
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सध्या रब्बी हंगामाची लगबग शिगेला पोहोचली असतानाच हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गहू, हरभरा आणि कांदा ही प्रमुख पिके काढणीच्या अंतिम टप्प्यावर आली असून शेतकऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन पीक उभे केले आहे. मात्र आता अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी कांदा काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी कांदा शेतातून काढून वाळवणीसाठी ठेवला आहे, तर काही ठिकाणी गव्हाची मळणी सुरू आहे. हरभऱ्याची काढणीही शेवटच्या टप्प्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर शेतात काढलेला माल भिजून त्याची गुणवत्ता घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारभावावरही परिणाम होऊ शकतो.
शेतकऱ्यांनी आधीच बियाणे, खत, औषधे व मजुरीवर मोठा खर्च केलेला आहे. त्यातच शेवटच्या टप्प्यावर पावसाचा फटका बसल्यास संपूर्ण हंगामाचे गणित विघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "संपूर्ण वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक आता हातात येण्याच्या वेळेला पावसामुळे वाया जाईल की काय," अशी खंत अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागात सध्या शेतकऱ्यांची धावपळ वाढली असून शक्य तितक्या लवकर काढणी व मळणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी शेतकरी काढलेला कांदा झाकून ठेवण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करताना दिसत आहेत. दरम्यान, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन काढलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवावा, तसेच वाऱ्यापासून व पावसापासून संरक्षणासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. अवकाळी पावसाच्या या शक्यतेमुळे सध्या संपूर्ण तालुक्यात शेतकरी वर्ग चिंतेच्या छायेत असून आकाशाकडे नजर लावून बसला आहे.