

Feeding points for stray dogs in Partur city.
परतूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्राणी जन्म नियंत्रण नियम २०२३ ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद परतूर प्रशासनाने कंबर कसली आहे. नगर परिषदेने आता शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी विशिष्ट ठिकाणे निश्चित केली असून, इतरत्र कोठेही खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिला आहे.
नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार, शहरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने शहरातील कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी खालील चार ठिकाणे निश्चित केली आहेत. मोंढा भाजी मंडई स्व. कन्हैयालाल क्रीडा संकुल, जुनी नगर परिषद इमारत पोलिस स्टेशन जवळ, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (आंबा रोड) हे ठिकाण निश्चित केले आहेत.
नगर परिषदेने शहरातील सर्व नागरिक आणि प्राणीप्रेमींना आवाहन केले आहे की, त्यांनी भटक्या कुत्र्यांना अन्नदान करायचे असल्यास केवळ वर नमूद केलेल्या ठराविक ठिकाणीच करावे. यामुळे कुत्र्यांचे व्यवस्थापन करणे सोपे होईल आणि शहरातील अस्वच्छता व उपद्रव टाळता येईल.