

The solid waste management project in Jalna city has been shut down
संघपाल वाहूळकर
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा कणा मानला जाणारा सामानगाव शिवारातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या पूर्णतः अवकळेच्या स्थितीत पोहोचला आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे मोठ्या अपेक्षेने उद्घाटन झाले होते. या प्रकल्पाकडून शहराच्या स्वच्छतेचे चित्र बदलण्याची आशा होती. मात्र कालांतराने दर्लक्ष, अपुरा निधी आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा प्रकल्प आज अडगळीत सापडल्याचे चित्र आहे.
सध्या शहरातून दररोज दीडशे टन कचरा गोळा होतो. सामनगाव शिवारात असलेल्या या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे जालना शहरातील कचरा टाकण्यासाठी सुमारे ४ हायवा, ३ कॉम्पेटर, ५ टिप्पर च्या सहाय्याने कचरा टाकण्यात येत आहे. सध्या येथे जेसीबीच्या सहाय्याने कचरा लोटण्याचे काम सुरू आहे. मात्र, कचऱ्याचे ढिगार जास्त साचले असल्याने येथे एका पॉकलेनची गरज असल्याचे सांगण्यात आले.
निर्माण होणाऱ्या या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली वर्गीकरण यंत्रणा बंद अवस्थेत आहे. तुटपुंज्या खर्चाच्या कारणास्तव यंत्रांची दुरुस्ती न झाल्याने कचरा थेट टाकला जात असल्याची परिस्थिती आहे. परिणामी ओला व सुका कचरा वेगळा न होता एकाच ठिकाणी साचत असून दुर्गंधी, माशा-मच्छरांचा प्रादुर्भाव आणि पर्यावरणीय समस्या गंभीर होत चालल्या आहेत.
या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेली सुमारे १० एकर जागा सध्याच्या कचरा निर्मितीच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. शहराची लोकसंख्या आणि विस्तार वाढला असताना प्रकल्पाच्या क्षमतेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे वाढतच असून, परिसरातील शेतजमीन व नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्यात तर कचऱ्याचा गाळ वाहून जाण्याचा धोका अधिकच वाढतो.
महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्याच्या घोषणा केल्या जातात मात्र प्रत्यक्षात ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कचरा संकलन, विलगीकरण आणि प्रक्रिया या तिन्ही टप्प्यांवर नियोजनाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते सत्तेसाठी कंबर कसत असताना, शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना जालनाकर व्यक्त करत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित होत असून, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करून तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा हा प्रकल्प केवळ उद्घाटनापुरताच मर्यादित राहून इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रतिदिन १२० ते १५० टन कचरा
शहरात ६८ हजार २६४, मालमत्ता असल्याची नोंद मनपाच्या कर विभागाकडे आहे. त्यामुळे शहरात प्रतिदिन तब्बल १२० ते १५० टन कचरा पडतो. हा कचरा संकलन करण्यासाठी मनपाच्या मालकीच्या एकूण ८२ घंटागाड्या आहेत. परंतु, ३० गाड्या कायमस्वरूपी नादुरुस्त असल्याने सध्या ५२ गाड्यांवर भार पडत आहेत. त्यात रोज तीन ते चार साड्या किरकोळ नादुरुस्ती अभावी नंद पडतात. त्यामुळे सरासरी शहरात डियमित ४५ घंटागाड्यांच्या माध्यमातून रूचरा संकलन केला जातो.
अमृत वन जवळ कचरा संकलन
शहरातील घंटागाड्यांच्या माध्यमातून जमा झालेला कचरा मोतीतलावाच्या बाजूला असलेल्या अमृतवनाजवळ आणल्या जातो. तेथे कचऱ्याचे संकलन केल्यात्यानंतर हायवा, टिप्परने सामनगाव येथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे टाकण्यात येतो.
ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त
कचरा वर्गीकरण करणाऱ्या मशिनचा एक पार्ट खराब झाला आहे. त्याला तांत्रिक भाषेत रिले म्हणतात. त्याची किंमत जास्त नाही. मात्र, त्या पार्ट अभावी घनकचरा प्रकल्प बंद अवस्थेत आहे. शिवाय, या घनकचरा प्रकल्पाला चालवण्यासाठी आवश्यक असलेला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झालेल्या विद्युत प्रवाह येत नाही. याकडेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
५ हजारांपेक्षा अधिक टन कचरा साचला
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आवारात सुमारे ५ हजार टनांच्याही पुढे कचरा साचला आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढिगार साचले आहे. ८ ते १० एकर शिवारात डंपिंग ग्राउंड करण्यात आले आहे. मात्र, जागोजागी साचलेल्या ढिगारामुळे जागा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यास हा प्रश्न मिटू शकतो, असे सांगण्यात येत आहे.