

बदनापूर — प्रतिनिधी
कारच्या भीषण धडकेत बदनापूर येथील बाप–लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दि. ०७ रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बदनापूर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील हुसेन नगर येथील रहिवासी शेख अजीम नसीर (वय ४०) व त्यांचा मुलगा शेख वसीम अजीम (वय १९) हे दोघे बदनापूरहून हसनाबादकडे इस्तेमासाठी मोटारसायकलने जात असताना विल्हाडी (ता. बदनापूर) परिसरात दाभाडीहून येणाऱ्या कार क्रमांक एमएच २१ सीए ०४४३ ने त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच २० सीई ९१२५ ला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख अजीम नसीर व शेख वसीम यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शेख अजीम यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर शेख वसीम याची उपचार सुरू असताना रात्री १ वाजता प्राणज्योत मावळली.
शेख अजीम नसीर हे बदनापूर येथे हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. यासोबतच मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानात समाजसेवेच्या भावनेतून कबर खोदण्याचे कार्यही ते करीत असत. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेमुळे समाजात त्यांना मोठा मान व प्रतिष्ठा होती.
बाप–लेकाचा एकाचवेळी झालेला मृत्यू मन हेलावून टाकणारा असून या घटनेने बदनापूर शहरावर शोककळा पसरली आहे. दोघांचा अंत्यविधी बदनापूर येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानात करण्यात आला. यावेळी बदनापूर तालुक्यासह परिसरातील हजारो आप्तेष्ट, नातेवाईक, समाजबांधव व मित्रमंडळींच्या डोळ्यांत अश्रू तर मनात वेदना होत्या.