

The leopard attacks again in the sugarcane field
शहापूर, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला करत रामा पथुजी लघुटे या मेंढपाळाची शेळी ठार केल्याची घटना घडली. ही घटना उसाच्या फडात घडली असून, घटनेनंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता जमिनीवर बिबट्याचे ठसठशीत पायांचे ठसे स्पष्टपणे आढळून आले. याच भागात एक महिन्यापूर्वी बिबट्याने वन गायीचा फडशा पाडला होता.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ वनविभाग व वनरक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे सविस्तर माहिती दिली. त्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीही हे ठसे बिबट्याचेच असल्याची अधिकृत पुष्टी केली. यावेळी वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मात्र, केवळ सूचना देऊन प्रशासन मोकळे होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अंबड तालुक्यातील रुई, दोदडगाव आणि पिटोरी सिरसगाव या भागात मागील काही दिवसांत चार ते पाच जनावरांची शिकार बिबट्याने केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे असतानाही वनविभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भरपाई द्यावी
"जोपर्यंत एखाद्या माणसावर हल्ला होणार नाही, तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही का?" असा थेट सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. शेतात काम करणारे शेतकरी, मेंढपाळ, महिलांसह लहान मुलेही भीतीच्या छायेत वावरत आहेत. नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावणे, गस्त वाढवणे व योग्य भरपाई द्यावी.