

The government is trying to save Dhananjay Munde: Manoj Jarange's criticism
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा माझ्या घातपाताची सुपारी देणारे धनंजय मुंडे यांना सरकार चौकशीपासून वाचवत आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.१७) केला. ते अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकार माझ्या कथीत घातपाताच्या प्रकरणातील चौकशी कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याची अंतर्गत माहिती मला मिळाली असल्याचेही जरांगे म्हणाले. येणाऱ्या दोन दिवसांत स्वतःला देण्यात आलेले पोलिस संरक्षण लिखित निवेदन देऊन नाकारण्याचा निर्णय घेणार आहे, असे सांगून जरांगे यांनी सरकारला माझ्यासाठी मोकळे मैदान पाहिजे असेल तर पोलिस संरक्षणाची गरज नाही.
आम्ही क्षत्रिय मराठा आहोत. कितीही अंगावर येऊ द्या मी आणि माझा समाज खंबीर आहे, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्या घातपाताच्या पापात सहभागी होऊन खूप वाईट करू लागले आहेत. येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत याचा वाईट परिणाम भोगावा लागेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन माझ्या घातपाताच्या चौकशीतून स्वतःला दूर ठेवण्याची विनंती केली असल्याचे मला समजले आहे. मी चौकशीला गेलो तर माझ्या विरोधातील लोक माझ्या समाजातील कार्यकर्त्यांना लक्ष्य करतील, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली असल्याचेही जरांगे यांनी सांगितले. जरांगेंनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून धनंजय मुंडे यांना क्लीनचिट देण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे सरकारवरचा विश्वास उडाला असल्याचेही जरांगे म्हणाले. सरकारने घातपाताच्या आरोपांतील दोषींना शिक्षा देणे अपेक्षित होते; परंतु उलट त्यांना संरक्षण मिळत असल्याचे दिसते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
घातपात प्रकरणातील कथीत आरोपी व इतर संबंधित व्यक्तींच्या संभाषणाच्या फोन क्लिप्सचा तपास करण्यात आला का? टॉवर लोकेशन आणि तांत्रिक पुरावे तपासले का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर सांगितले की, वैद्यनाथ देवस्थानची पूजा करून प्रच-ाराला लागा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात राजकारण करायला पाहिजे नव्हते, असे मत त्यांनी व्यक्त केले.