Jalna News : वरुणराजाच्या आगमनाकडे बळीराजाचे डोळे

१५ जून उलटूनही जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल
Jalna News
Jalna News : वरुणराजाच्या आगमनाकडे बळीराजाचे डोळेfile photo
Published on
Updated on

The farmer's eyes are fixed on the arrival of the Rain

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात १५ जून उलटूनही समाधानकारक पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामाची तयारी पूर्ण करून बसलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले असून, पावसाअभावी शेतीची कामे खोळंबली आहेत. याचा परिणाम खत व बियाणे विक्रेत्यांवरही होत असून त्यांच्या दुकानांमध्ये अपेक्षित गर्दी दिसून येत नाही.

Jalna News
Farmers worried : पाऊस कधी येणार याचीच सर्वत्र चर्चा

जालना जिल्ह्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ६०३ मिमी आहे. मात्र १५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या मध्यावरही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. अनेकांनी कापूस, सोयाबीन, मका तसेच इतर खरीप पिकांसाठी बियाणे व खते खरेदी करण्याची तयारी केली असली, तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने ते प्रतीक्षेत आहेत.

दरवर्षी काही शेतकरी विहिरी व बोअरवेलमधील उपलब्ध पाण्यावर उन्हाळी बागायती पिके तसेच मिरची, कापूस यांसारख्या पिकांची लागवड करतात. मात्र यंदा पावसाळा लांबल्याने भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्याने उन्हाळी पिकांचे नुकसान झाले असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Jalna News
Jalna Agriculture News : तालुक्यातील बळीराजाचे डोळे आभाळाकडे

दुसरीकडे, खत व बियाणे विक्रेत्यांनी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे. परंतु पावसाअभावी शेतकरी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने विक्रेत्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली असली, तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांच्या चिंतेतून दिलासा मिळणार नाही. सध्या जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांचे लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news