Jalna Agriculture News : तालुक्यातील बळीराजाचे डोळे आभाळाकडे

खरीप हंगामाची पेरणी रखडली, मशागतीचे कामे पूर्ण
Jalna Agriculture News
तालुक्यातील बळीराजाचे डोळे आभाळाकडेpudhari photo
Published on
Updated on

घनसावंगी : तालुक्यासह परिसरात खरीप हंगामाच्या तोंडावर अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दुपारनंतर व सायंकाळी आकाशात काळ्या ढगांची गर्दी होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावत आहेत; मात्र ढग विरून जात असल्याने अपेक्षित पाऊस होत नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बळीराजाच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांत तालुक्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला असला तरी हा पाऊस पेरणीसाठी आवश्यक असलेल्या व्यापक आणि समाधानकारक पावसाच्या तुलनेत अपुरा ठरला आहे. परिणामी शेतकऱ्यांची नजर आता नैऋत्य मान्सूनच्या आगमनाकडे लागली आहे.

Jalna Agriculture News
Farmers worried : पाऊस कधी येणार याचीच सर्वत्र चर्चा

खरीप हंगामाची पूर्वतयारी जवळपास पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत, नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती यांसह पेरणीपूर्व सर्व कामे पूर्ण केली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, आदी पिकांसाठी बियाणे आणि खतांची खरेदी करून ठेवली आहे. काहींनी कर्ज काढून शेतीची तयारी केली असल्याने आता केवळ दमदार पावसाची प्रतीक्षा शिल्लक राहिली आहे.

सध्या अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची अंतिम मशागत करत असून पाऊस पडताच पेरणी करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र समाधानकारक पाऊस न झाल्यास पेरणी उशिरा होण्याची शक्यता आहे. पेरणी लांबल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी वेळेत पावसाची अपेक्षा बाळगून आहेत.

Jalna Agriculture News
Agriculture News Jalna : खरीप हंगामाची चाहूल; कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी

वातावरणातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. सकाळी उन्हाचा कडाका आणि दुपारी ढगाळ वातावरण, अशा बदलत्या हवामानाचा शेती नियोजनावर परिणाम होत आहे. वादळी वारे व विजांच्या कडकडाटामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करावे. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. घाईघाईने पेरणी केल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे."

डॉ. सखाराम पवळ, तालुका कृषी अधिकारी

खरीप हंगामासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बियाणे व खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र समाधानकारक पाऊस होत नसल्याने पेरणीचा निर्णय घेता येत नाही. आता दमदार पावसाचीच प्रतीक्षा असून वेळेत पाऊस झाल्यास हंगाम चांगला जाईल."

प्रविण धांडगे, शेतकरी, राहेरा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news