

The farmer slapped the Talathi
जालना, पुढारी वृत्तसेवा ः आईच्या नावाने मृत्यूपत्राधारे झालेला फेर तत्काळ रद्द करण्याच्या मागणीवरून अंबड तहसील कार्यालयात तणावपूर्ण घटना घडली. भांबेरी येथील एका शेतकऱ्याने तलाठ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 19 डिसेंबर) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात घडला. या घटनेमुळे तहसील कार्यालयात काहीकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संजय बापूराव कणके यांच्या आई ताराबाई बापूराव कणके यांच्या मृत्यूपत्राधारे शेतजमिनीचा फेर करण्यात आला होता. हा फेर तत्काळ रद्द करावा, अशी मागणी संजय कणके यांनी तलाठी तुपकर यांच्याकडे केली.
मात्र, हा निर्णय मंडळ अधिकाऱ्यांच्या अधिकारात येतो, असे सांगितल्याने संतप्त झालेल्या कणके यांनी तलाठ्याला कानशिलात लगावली. तसेच तलाठी तुपकर व मंडळ अधिकारी नरुटे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल अलका केंद्रे करीत आहेत. या प्रकरणी चंदनापुरी सजा येथील तलाठी पवन तुपकर यांच्या फिर्यादीवरून शेतकरी संजय बापुराव कणके (रा. भांबेरी) यांच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.