

The District Collector held a review meeting with all the chief officers of the district
जालना, पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांच्या मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विविध प्रशासकीय व विकासात्मक मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, रस्ते व पथदिवे, मालमत्ता कर व इतर महसूल वसुली तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर सुरू असलेल्या विकासकामांचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत व दर्जेदार मिळाव्यात यासाठी सर्व मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
जनावरांसाठी कोंडवाडे उभारणे, भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे मोकाट फिरणाऱ्या स्थापन करणे, थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविणे तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
१७७९ घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) १.० अंतर्गत जिल्ह्यात मंजूर झालेल्या एकूण ७,५३१ घरकुलांपैकी ५,४०९ घरकुले पूर्ण झाली असून १,७७९ घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०, नगरोत्थान योजना, दलित व इतर वस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, आयसीटीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन स्कॅनिंग यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवरही सविस्तर आढावा घेण्यात आला.