

टेंभुर्णी : गणेशोत्सव व आगामी महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजारात महिलांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सजावटीच्या साहित्यासह किराणा दुकानावर जास्त गर्दी होती.
यंदा गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सण एकाच आठवड्यात आल्याने खरेदीचा उत्साह दुप्पट दिसून आला. टेंभुर्णी, पापळ, आंबेगाव, कुंभारझरी, , अकोला, देव, आणि परिसरातील गावागावातून नागरिकांनी खरेदीसाठी टेंभुर्णी बाजारात मोठी गर्दी केली होती.
यावर्षी बाजारात रंगीबेरंगी रेडिमेड फुलांच्या हार माळा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या होत्या. महिलांसाठी महालक्ष्मीचे आकर्षक मुखवटे, साडी, चोळी, बांगड्या, हळद कुंकू, मेहंदी यांची विशेष दुकाने थाटली होती. महिलांनी हळद कुंकू लावून मनोभावे महालक्ष्मीच्या मुखवट्यांची खरेदी केली.
तर लहान मुलांमध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत घरगुती गणपती बाप्पाच्या छोट्या मूर्ती खरेदी करण्याचा उत्साह दिसून आला. यासोबतच पूजेचे साहित्य, आंब्याच्या पानांचे तोरण, नारळ, विड्याची पाने, फळे, मिठाई यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
शेतकऱ्यांसाठी बैलगाडी, गाय वासरू, शेती उपयोगी साहित्य आणि सजावटीचे सामानही बाजारात विक्रीसाठी आल्याने बाजाराला वेगळीच शोभा आली होती. आठवडे बाजारात नव्याने दाखल झालेल्या रेडिमेड महालक्ष्मी दोन हजार रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
मोठी उलाढाल
गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून सणाच्या खरेदीसाठी बाजारात उतरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होते. सर्वच दुकानांमध्ये सकाळपासूनच उलाढाल सुरू होती.